रावळगाव : महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील, साखर व मेवामिठाई यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या १३,२५२ (१९८१). हे मालेगाव तालुक्यात मालेगावच्या वायव्येस सु. १९ किमी. अंतरावर वसलेले आहे. पूर्वी हे एक छोटे खेडेगाव होते. १९२३ नंतर प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी या भागातील सु. ६०७ हे. पडीक जमीन काही भाडेपट्ट्याने व काही विकत घेऊन परिश्रमपूर्वक कृषियोग्य जमिनीत रूपांतर केले. त्यांनी गिरणा कालव्याचा उपयोग करून ऊस उत्पादन सुरू केले व १९३३ साली रावळगाव शुगर फार्म लि. ची स्थापना करून साखरकारखाना उभारला. याच उद्योगसमूहातर्फे १९४० मध्ये खडीसाखरेचे संशोधन केंद्र व कारखाना सुरू करण्यात आला. पुढे येथे गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर मिठाईंची निर्मिती सुरू झाली (१९४९). ‘रावळगाव’ या नावाने ही उत्पादने महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.
कारखान्याच्या सभोवारच्या प्रदेशात एक आदर्श वसाहत स्थापन झाली. येथे आरोग्य केंद्रे, रुग्णालय, शाळा, डाक व तार कार्यालय, विश्रामधाम अशा सुविधा निर्माण झाल्या. गावात शनी, राम, महादेव व पिंपळदेव यांची मंदिरे असून समोर हनुमान मंदिर आहे. गावात रविवारी आठवड्याचा बाजार भरतो. जवळच दाभाडी येथे सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आहे. पण रावळगाव गोळीची सुरुवात कशी झाली हे विशेष आहे. या चॉकलेट फॅक्टरीची स्थापना केली महाराष्ट्राचे भाग्यविधाते उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी. जहाजनिर्मिती, विमान, रायफल, कार यांसारख्या मोठ्या उद्योगांसोबतच त्यांनी मिठाई उद्योगातही पाऊल टाकले.
वालचंद यांचे वडील सोलापुरातील मोठे अडत व्यापारी होते, पण वालचंद यांना त्या धंद्यात रस नव्हता. त्यांनी रेल्वेचे कंत्राट घेण्याचे काम सुरू केले, त्यानंतर बांधकाम व्यवसायात उतरले. त्यात यश मिळाल्यावर त्यांनी रावळगाव येथे दीड हजार एकर पडिक जमीन विकत घेतली. गिरणा कालव्याचा वापर करून त्यांनी ती जमीन पिकाऊ बनवली. उसाची लागवड यशस्वी ठरली आणि पुढे रावळगाव ब्रँडचे चॉकलेट व गोळ्या महाराष्ट्रात घराघरात पोहोचल्या. पेपरमिंटच्या वड्या, ताज्या दुधाची टॉफी, लॅको बॉन बॉन, पत्री खडीसाखर ही खास उत्पादने लोकप्रिय झाली.
उत्पादनाबरोबरच मार्केटिंगलाही महत्त्व देऊन वालचंद हिराचंद यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे रावळगाव हा ब्रँड परदेशी कंपन्यांना टक्कर देऊ लागला. रावळगाव चॉकलेटला आज जवळपास ऐंशी वर्षांचा वारसा आहे. अजूनही तुरळक ठिकाणी ते मिळते. आपल्या अनेक पिढ्या या गोळ्या खाऊन मोठ्या झाल्या आहेत आणि ती चव आजही लक्षात राहते. कारखान्याच्या भोवताली वसाहत, आरोग्य व शैक्षणिक सुविधा उभ्या राहिल्या. मात्र कालांतराने उद्योगाला उतरती कळा लागली.
२०११ च्या जनगणनेनुसार रावळगाव गावाची लोकसंख्या ९२१२ असून त्यात ४६५२ पुरुष आणि ४५६० महिला आहेत. ०-६ वयोगटातील मुलांची संख्या ११०४ आहे जी एकूण लोकसंख्येच्या ११.९८% आहे. गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर ९८० असून ते महाराष्ट्र राज्याच्या ९२९ च्या सरासरीपेक्षा जास्त आहे. बाल लिंग गुणोत्तर ९१३ आहे, जे राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. गावातील साक्षरता दर ८०.७७% असून महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत किंचित कमी आहे. पुरुष साक्षरता ८८.६६% आणि महिला साक्षरता ७२.८०% आहे. पंचायती राज कायद्यानुसार गावाचा कारभार निवडून आलेल्या सरपंचाकडे असतो.